Tuesday, August 18, 2009

संक्रमण

रविवारी सकाळी चहा घेत पेपर वाचत बसलो होतो. ही म्हणाली अहो, आज  आमच्या मंडळाची मीटिंग आहे बरं का! कॉलनीतल्या सगळ्या महिलांसाठी एक महिला मंडळ स्थापलेलं होतं. मंडळ कसलं याचं? गोंधळ नुसता! काही सामाजिक काम नाही की विधायक कार्य नाही. नुसत्या फालतू गप्पा, एकमेकांची उणी-दुणी किंवा पोकळ स्पर्धांचं आयोजन! स्पर्धांना तरी ऊत आला होता. स्पर्धा कसली? तर म्हणे, चपलांचा ढीग करायचा त्यातून नवऱ्याने बायकोच्या व बायकोने नवऱ्याचा चपलांची जोडी शोधून, जो पहिला पोचेल त्याला पहिले बक्षीस! काहीतरी निरर्थक.

एकदा शेजारचा सारोळकर आला व म्हणाला, "पेढे दे. " "कसले? " "अरे वहिनींना स्पर्धेत पहिलं बक्षीस मिळालंय. "

"अस्सं? कोणत्या? " मी आश्चर्याने विचारलं.

तो म्हणाला, 'वाद-विवादाच्या'.

हे ऐकून मात्र मनातून मी खजील झालो. या ऐवजी वक्तृत्वाच्या असत्या तर नक्कीच पेढे वाटले असते. पण हसत हसत म्हटलं, अरे खरं तर हे बक्षीस तिला फार पूर्वीच मिळायला हवं होतं. आमच्या घरात देखील तीच याचं बक्षीस पटकावते. काही का असेना, या स्पर्धेपासून ती मंडळाची सेक्रेटरी झाली होती एवढं खरं.

मी काही बोलत नाही हे पाहून ती म्हणाली, 'अहो ऐकलंत ना? '

'हे आता कोणत्या स्पर्धा ठेवणार? ' मी वाचत म्हणालो.

अय्या, तुम्ही कसे ओळखलंत?

तुमचं मंडळ दुसरं काय करतं?

नाही हं माझ्या हातात बॅट आहे तोवर मी चौफेर फटकेबाजी करणार आहे.

म्हणजे? मी म्हणालो.

अहो, मी सेक्रेटरी असे पर्यंत हो.

अगं पण प्रत्येक वेळा पाककलेच्या स्पर्धाच कशाला? कधी तरी मुलांसाठीही काहीतरी ठेवावं म्हणजे कथा-कथन, सामान्य ज्ञान, पाठांतर, राम-रक्षा, गीतेचे अध्याय, अशांनी बुद्धीला जरा चालना तरी मिळेल किंवा ज्या महिला खाण्याचा एखादा पदार्थ चांगला बनवितात तो मोठ्या प्रमाणावर करून अनाथाश्रम, अंधशाळांना वगैरे जाऊन अन्नदान करा. सत्कार्य तरी होईल.

जाऊ द्या हो. तसलं कटकटीचं काही नको बाई. मेल्या शिष्ट आहेत सगळ्या. कधी असला एखादा प्रस्ताव मांडलं की हात झटकून मोकळ्या होतात. पण पाककला स्पर्धा म्हणताच मधमाश्या सारख्या गोळा होतात.

हिच्या समोर काही बोलण्यात तसा अर्थच नव्हता. बरं मग. कोणते पदार्थ ठेवणार?

हे बघा रव्याचा गोड पदार्थ व तांदळाचा तिखट पदार्थ. चला ठरलं तर मग. आज जाहीर करते. हिचा हुरूप पाहून मी म्हटलं, असले उद्योग केल्यापेक्षा सुट्टीत मुलांचा अभ्यास घे जरा.

ते अभ्यासाचं तुम्हीच बघा बुवा. ती कार्टी काही माझं ऐकत नाहीत. एवढं म्हणून बाईसाहेब मोकळ्या झाल्या.

स्पर्धेचा दिवस ठरला, सगळा स्त्री वर्ग कामात गर्क झाला. मुले पिशव्या घेऊन बाजारात पळू लागली. प्रत्येकाच्या घरातून तेलकट, तुपकट, खमंग असा वास येऊ लागला. रव्याचे लाडू नि तांदळाची चकली असे हिचे पदार्थ ठरले. घरात रोज एक नमुना होऊ लागला. एक दिवस हिने डिश मध्ये सुरेख सजवून लाडू आणले. मी म्हटलं, अरे वा! सजावट तरी छान झालीय. आता चव बघू म्हणून लाडू खायला लागलो पण काही केल्या तो फुटेना. हे काय गं?

थांबा हं मी फोडते.

पण हिचाही जोर अपुरा पडला. मुले दातांनी चावून खायचा प्रयत्न करू लागली. शेवटी मंगेशनं जमिनीवर आपटून फोडला व साऱ्यांना खायला दिला. असले कडक लाडू तू स्पर्धेला ठेवणार? अगं हा लाडू इथून एखाद्याच्या अंगावर नेम धरून मारला ना तर तो जखमी होईल, पण तुझा लाडू तसाच राहील. माझ्या या वक्तव्यावर मुले खो खो हसू लागली. हिनं चिडून धाकट्याच्या पाठीत धपाटा घातला. त्याने भोकाड पसरलं. ही हिरमुसली. मी जरा समजावण्याच्या स्वरात म्हटलं, अगं चव चांगली आहे. फक्त जरा मऊ होतात का ते बघ. चकलीचं असं होऊ देऊ नकोस. हिने मान डोलावली.

स्पर्धेच्या दिवशी दुपारी दोनलाच मी घरातून पळ काढला व दुपारच्या पिक्चरला जाऊन बसलो. म्हटलं नसती कटकट नको. संध्याकाळी सहा-साडेसहाला आलो तेव्हा आमच्या कॉलनीतल्या कॉमन हॉल मधून जोरजोराचा आवाज येत होता. अरे , स्पर्धा सोडून हा कसला आवाज? म्हणून मी आत डोकावला तर हिचा व साठे वहिनींचा कडाडून वाद चालला होता. मी मंगेशला म्हटलं अरे काय झालं? बाबा, अहो बक्षिसाच्या  क्षुल्लक कारणावरून दोन गटांत जो वाद चाललाय तो केव्हाचा. कुणीच कोणाचं ऐकत नाही. दूरून श्रीमान साठे माझ्याकडे पाहत होते. अतिशय सज्जन गृहस्थ ! यातून काहीतरी मार्ग काढला पाहिजे असं मी ठरविलं.

एकंदरीत वातावरण पाहिलं व मंगेशला म्हणालो, मंग्या अरे जोरात शिट्टी वाजव बरं. पडत्या फळाची आज्ञा! मंग्याने ती इतक्या जोरात वाजविली की त्या भांडणाऱ्या दोघींसह सगळ्यांनीच त्या आवाजाच्या दिशेने पाहिलं. साऱ्यांचं स्पर्धेचं वेड लक्षात होतंच. मी म्हणालो, हे बघा मंडळी, सध्या जे काही चाललंय त्याला आपण या वादविवादाच्या स्पर्धाच आहेत असं जर समजलं तर त्याचं पहिलं बक्षीस कोणाला द्यावं असं तुम्हाला वाटतं? माझी ही कल्पना पाहून साठेंनी माझ्याकडे पाहत डोळे मिचकावले. मीही त्यांना प्रतिसाद दिला.

' स्पर्धा ' हा शब्द ऐकताच वातावरणाचा सारा नूरच पुन्हा बदलला. सारे एकदम शांत होऊन हलक्या आवाजात आपापसात कुजबुजे लागले. सध्याचे युग हे स्पर्धेचे अन त्यानिमित्ताने मिळणाऱ्या बक्षिसाचे आहे हे मला ठाऊक होते पण त्या स्पर्धांनी लोकांना इतकं वेडंपिसं बनवलं असेल याची मलाही कल्पना नव्हती. बहुधा माझा घाव अचूक लागला असावा. आता साहजिकच दोन्ही गटांतून विरुद्ध पार्टीची नावे येऊ लागली. पेच निर्माण झाला. नेमकं कोणाचं नाव जाहीर करावं कळेना. म्हटलं आता पुन्हा वाद सुरू होणार. एवढ्यात साठे हसत म्हणाले, 'शेळके, पहिलं बक्षीस दोघांनाही विभागून दिलं तर योग्यच होईल ना?' आणि ही कल्पना मात्र साऱ्यांनीच उचलून धरली. सगळीकडे हास्य -कल्लोळ पसरला. हिप हिप हुर्ये! मुलं दंगा करू लागली. साठेंनी अप्रत्यक्षपणे दोघींचीही उडविलेली खिल्ली घालून लगेचच त्यांनी घर गाठलं.

दुसऱ्या दिवशी हलक्या आवाजात ही मला म्हणाली, अहो, काल जे काही झालं ते व्हायला नको होतं ना? मी रात्रभर विचार केला. तुमचंच म्हणणं पटलं बघा आता. उगाच असल्या स्पर्धा घेऊन त्यात वेळ व शक्ती वाया घालवून, एकमेकींची मनं कलुषित केल्यापेक्षा स्पर्धेच्याऐवजी सर्वांनी मिळून सण-वार प्रसंग पाहून खाद्यपदार्थ बनवून एखाद्या अनाथ आश्रमाला किंवा अंधशाळेला भेट देणं, अशिक्षितांना साक्षर करणं, संस्कार वर्ग यात रस घेणंच योग्य होईल. मग तर तुमची मदत होईल ना?     

मी स्वप्नात तर नाही ना म्हणून स्वतःलाच चिमटा काढून पाहिला व भानावर येऊन म्हणालो, खूप आनंद झाला बघ तुझे विचार ऐकून. अगं अशी जर कामं तुमचं मंडळ करेल तर कॉलनीतल्या साऱ्या पुरुषवर्गाचा पाठिंबा तुम्हाला मिळवून देईन याची खात्री बाळग. एक स्त्री, एका कुटुंबास जर नावारूपाला आणते तर अनेक स्त्रिया मिळून किती विधायक कार्य करू शकाल?

हो ना? ठरलं तर मग. मी आजच मीटिंग बोलावते असं म्हणत ही आत निघून गेली.

एका रात्रीत अफलातून वैचारिक संक्रमण झालेल्या माझ्या पत्नीकडे मी 'आ' वासून पाहू लागलो. कधी एकदा साहेबांना हे सगळं सांगेन असं झालं होतं. विभागून दिलेल्या बक्षिसाचे दुसरे दावेदार, म्हणजे त्यांच्या पत्नीचेही असेच मन-परिवर्तन झाले की काय? हे जाणून घेण्याची आतुरता लागली होती.

===========

---- सौ. माधुरी शहा, सोलापूर.

===========

1 comment:

Shree said...

very nice..easy going!