Monday, August 10, 2009

सेतू

दारावरची बेल वाजली अन पाठोपाठ पोस्टमन अशी हाक ऐकून दुर्गाकाकूंनी लगबगीनं दार उघडलं. अपेक्षेप्रमाणे मोहनचंच पाकीट होतं. झोपाळ्यावर बसत त्यांनी पाकीट उघडलं, पाहते तो आत मंजिरीचं मोठं पत्र होतं. सूनबाईचं पत्र पाहून त्यांना आश्चर्यच वाटलं. त्यांनी वाचायला सुरू केली.

ती. सौ. आईंना,

शि. सा. न. वि. वि.

आपणा सर्वांचा प्रेमळ निरोप घेऊन आम्ही इकडे सुखरूप पोहोचलो. बदलीचं गाव, माणसं, वातावरण, सारंच नवीन. सगळं लागतंदुकतं होईपर्यंत दीड दोन महिने कसे उलटले समजलंच नाही. त्यात लग्नापासून कोणतेच काम स्वतंत्रपणे व जबाबदारीनं केलं नसल्यानं साध्या साध्या गोष्टीत सुद्धा वेळ जास्त जायचा.

आई, तिकडून निघताना बदलीच्या निमित्तानं का होईना, कथा-कादंबऱ्यांत वाचलेल्या विचारांप्रमाणे व प्रचलित संकेताप्रमाणे राजा-राणीच्या स्वतंत्र संसाराची गुलाबी स्वप्नं रंगवीत इकडे आले खरी, पण इथे आल्यानंतर प्रत्यक्ष संसार उभारताना व चालवताना 'कल्पना' व 'सत्य' यातील अंतर जाणवू लागलं. स्वातंत्र्याच्या नावाखाली वेगळं राहायची जी आजकाल फॅशन झाली आहे ती खरोखरच फायदेशीर आहे का? याचेच मन विचार करू लागलंय.

एकटीन्ं संसार करणं म्हणजे तारेवरची कसरतच! घरचं, बाहेरचं, पाहुणारावळा, आजारपण, खर्चाचं बजेट, छे, छे, छे, किती व्याप! तेही सारं एकट्यानं सांभाळायचं? कोण ओढाताण होते जीवाची! अन याची प्रकर्षानं जाणीव झाली ती माझ्या मामांच्या गाडीला ऍक्सिडेंट झाला त्यावेळी! ते ४-५ जण, सगळेच दवाखान्यात. त्या साऱ्यांचं पथ्यपाणी, खाणं पिणं, त्यांचा पाहुणा सारं सांभाळेपर्यंत माझी काय त्रेधा उडाली असेल ते शब्दात सांगू शकायची नाही आई. कारण आजवर एकटीनं कधीच काही केलं नव्हतं त्यामुळे कधी नाश्ता बिघडे, तर कधी स्वयंपाक, कधी अपुरं पडे तर कधी वाया जाई. रोज एक तऱ्हाच! त्यात आमचं पाकशास्त्रातलं ज्ञान म्हणजे अगदीच अननुभवी अन परावलंबी! तरी बरं त्यातल्या एकदोघांच्या बायका माझ्याकडे आल्यामुळे ती वेळ निभावली. पण अशा परावलंबनाची मात्र माझी मलाच शरम वाटली. एक स्त्री असून अशा साध्या गोष्टी मला येऊ नयेत?

खरं सांगू आई, तुमची मात्र तीव्रतेने आठवण होई. लग्नानंतर संपूर्ण वर्ष तुमच्यासारख्या सुगरणीच्या सहवासात घालविला पण धड एक काम मन लावून शिकले नाही. आता मात्र मनोमन निश्चय केला की सारं तुमच्याकडून शिकायचं. तुमची शिस्त, माया, साऱ्यांना आग्रहाने खाऊ घालणं, प्रसंगी कर्तव्यदक्ष राहून कानउघाडणी करणं, प्रापंचिक जबाबदाऱ्यांची जाण! किती गोष्टी सांगू? मला हे सारं शिकायचंय. आई मला सारं हक्कानं शिकवा व रागावासुद्धा! खरं तर हे सारं लग्नाआधीच शिकायला हवं होतं. पण शिक्षण, एतर क्षेत्रातला सहभाग, नोकरी व करिअरसाठीची वृथा धडपड, या साऱ्यात घरातलं पाहायला वेळच नसायचा. खरं सांगायचं तर त्यास गौण महत्त्व देऊन वेळ दिलाच नाही. पण सुखी संसारासाठी त्या साऱ्यांइतकंच हे गरजेचं आहे हे आता कळू लागलंय. असो.

तुम्ही व ती. बाबा कसे आहात? इकडे चार भिंतीत कोंडल्यासारखं होतं. शहरी संस्कृती - ना आपलेपणा ना मायेची ऊब! जो तो जीवन जगण्यापेक्षा जीवन रेटतोय असंच वाटतं. त्यामुळे मनाची तगमग होते व एकटेपणा जाणवतो. असो. बाकी तसं क्षेम. पत्र लिहा. तुमचा आशीर्वाद हवाय.

तुमची आज्ञाधारक,

सौ. मंजिरी

दुर्गाकाकूंनी पत्र संपविलं व पदराने डोळे पुसले. त्यांना वाटलं आपलंच चुकलं. पोरीबरोबर सोबतीला जायला हवं होतं. पण इथला पसारा टाकून जाणं शक्य नव्हतं. अन् कधी वाटायचं, दोघांत तिसरीची अडगळ, असं नको व्हायला. मंजिरीच्या चालू अवस्थेचं वाईट वाटलं, पण मन मात्र सुखावलं. संसाराच्या जबाबदाऱ्यांची लवकर जाणीव झाली होती. मातीचा गोळा अजून ओला होता. आता त्याला हवा तो आकार आपण देऊ. पेन कागद घेऊन त्या पत्राचं उत्तर द्यायला बसल्या.

चि. सौ. मंजिरीस,

प्रेमळ आशिस.

तुझं पत्र आत्ताच मिळालं. मजकूर व खुशाली समजली. तुमच्याच पत्राची वाट पाहत होते.

संसार व जबाबदाऱ्यांबद्दल तू जे काही लिहिलंस ते खरंच आहे. पोरी नेटका संसार करणं ही सुद्धा एक कला असते. खरं म्हणजे स्त्रीला ती निसर्गतःच अवगत असते. परंतु ती लिहुन-वाचून समजणं अवघडच. त्याला प्रत्यक्ष अनुभवच फायदेशीर ठरतो. तू पत्रातून जे माझ्याबद्दल लिहिलंस ती जाण येण्यासाठी परिस्थितीनं तावून सुलाखून निघावं लागलं. यावरून मला माझं पूर्वायुष्य आठविलं. पोरवयात लग्न झालं. असून अंगाची हळद ओलीच होती. तोवरच सासूबाईंनी जे अंथरूण धरलं ते त्यातून त्या उठल्याच नाहीत. मामंजी नव्हतेच. परिस्थिती बेतातीच. मग त्यांनी अर्धवट शिक्षण सोडून कारकुनी सुरू केली आणि मी पोळीभाजीचे डबे. लग्नाची नवलाई, हौस, मौज वगैरीचा विचार करायला उसंतच नव्हती. तशातच मोहनचा जन्म झाला. त्याचं संगोपन, शिक्षण.. प्रतिकूल परिस्थितीच्या थपडा खात जिद्दीनं संसार केला. पण त्यातदेखील एक ऊर्मी होती. स्वतः काहीतरी केल्याचं समाधान होतं. मोठ्या कष्टानं आज सारं नावारूपाला आलंय खरं. पण त्यामागील जी अनुभवाची शिदोरी आहे त्याच्या साहाय्यानेच मी तुला तयार करणार आहे.

अगं खरं म्हणजे मुलींना शालेय, यांत्रिक शिक्षण जितकं महत्त्वाचं असतं, तितकंच प्रापंचिक शिक्षण गरजेचं असतं हे आईंनी व मुलींनी जाणून घेतलं पाहिजे. हल्लीच्या बहुतांशी मुलींना संसारापेक्षा आपलं करियर महत्त्वाचं वाटतं. घरात काय टाइम वेस्ट करायचाय? हा प्रश्न त्या विचारतात. करियर तर निश्चितच महत्त्वाचे आहे, पण कुटुंबाशी जवळीक साधून कुटुंब सुखी करायचं असेल तर थोडासा टाइम वेस्ट करायलाच हवा, नाही का? अगं कुटुंबात आपलेपणा निर्माण करणं, एकमेकांना मायेच्या धाग्यांनी एकत्र बांधणं, त्यांच्या सुखदुःखात सहभागी  होणं हीच तर खरी सुखी संसाराची गुरुकिल्ली आहे व जी स्त्री या आधारे संसार समर्थपणे सांभाळते तीच आपल्या कुटुंबाला ऊर्जितावस्थेत नेऊ शकते आणि एकदा घरची घडी व्यवस्थित बसली की मग घरचं सांभाळून बाहेरची क्षेत्रं सांभाळणं फारसं अवघड नसतं. उलट प्रत्येक घटकाचा पाठिंबाच मिळतो. पण त्यासाठी दोन्ही पिढीत सुसंवाद व सामंजस्याचा भक्कम सेतू हवा. कोणत्याही बाबतीत कमीपणा न मानता मुलींनी/सुनांनी मोकळ्या मनाने विचारायला हवं व तेवढ्याच मायेने, हक्काने आईने/सासूने तिला सांभाळून घेत, एकमेकींना समजून घेत सारं शिकवायला हवं.

मंजू, संगणक युगातल्या मुली तुम्ही! अभिमान वाटावा अशा प्रत्येक क्षेत्रात अग्रगण्या व निपुण. अगदी अंतराळातसुद्धा झेप घेतलीय. मग जरा अंतःकरणात डोकावून पाहत याही क्षेत्रात निपुण झालात तर खऱ्या अर्थाने जीवन यशस्वी व सुखमय नाही का होणार? प्रत्येक क्षेत्रांतलं नैपुण्य व स्वयंपूर्णताही वैयक्तिकरीत्या तर फायद्याची व भूषणावह असतेच पण ती कौटुंबिक व सामाजिकदृष्ट्याही फलदायी ठरते. हे सारं अवघड नसतं. फक्त जिद्द व समजूतदारपणा हवा एवढंच. तू काळजी करू नकोस. स्वभावातला लवचिकपणा व मोकळेपणा हाच तुझा मोठा गुण आहे याची जाणीव पत्रातून व अनुभवातून झालीच आहे. तेव्हा यशस्वी होणारच. उलट दोन पिढीत सेतू बांधताना माझ्याकडून काही उणीव राहू नये याच धडपडीत मी राहीन, याची खात्री ठेव. मोहनला प्रेमळ आठवण.

तुझी,

सौ. आई.

दुर्गाकाकूंनी पत्र पूर्णं केलं व रघूस पोस्टात टाकायला सांगून समाधानी मनाने झोपाळयाचे झोके घेत विचारात गढून गेल्या. त्यांना वाटलं प्रत्येक तरुणीने जर मंजिरीसारखा विचार केला तर...

===========

---- सौ. माधुरी शहा, सोलापूर.

===========

1 comment:

श्रद्धा said...

खूपच एककल्ली कथा आहे. कदाचित तुमचे अनुभव असे असतील. तरीही पटली नाही. म्हणजे खरी मुळीच नाही वाटली. असो.
तुम्ही छान लिहिता - अनुभवावरुनच लिहिता असा भास होतो. थोडं तटस्थपणे लिहिता आलं तर अजुन छान वाटेल, असे वाटते. ही फ़क्त सूचना आहे, तेव्हा राग मानू नये.

पुढील लिखाणासाठी शुभेच्छा!