Friday, March 20, 1998

जत्रा

मुलं आणि ही सारखी जत्रेला जाऊ म्हणून मागे लागली होती. मीच जरा लांबणीवर टाकीत होतो. राजू-संजू जरी जाणते होते तरी पिंकी फारच लहान होती. शिवाय जत्रेला गर्दीही बरीच. शेवटी रविवारी संध्याकाळी आमचं पंचक बाहेर पडलं. मुलांचा व हिचा उत्साह ओसंडून वाहत होता. मुलांनो, अरे हात नीट धरा, आम्हाला सोडून कुठे जाऊ नका, वगैरे सूचना मी देत होतो.  राजू तसा समंजस, पण आमच्या संज्या, मात्र नंबर एकचा वात्रट! कोणत्या वेळेस काय करेल याचा नेम नाही. जत्रेचं मैदान तसं घरापासून जवळ होतं म्हणून पायीच निघालो.

मौत का कुवाँ, हंसी घर, डिस्नी लँड वगैरे सारे प्रकार पिंकीला सांभाळत पाहून झाले. एवढ्यात, "काय मस्त वास येतोय नाही बटाटेवड्यांचा!" हिच्या बोलण्यातला रोख लक्षात घेऊन व साऱ्यांनी त्यास पुष्टी देत वडे खाल्ले. पुढे गेलो तर हरतऱ्हेचे पाळणे. मी सहज विचारलं, कशात बसायचं?  तर प्रत्येकाचं एक वेगळं मत. शेवटी ही म्हणाली, मुलांनो, साध्याच मोठ्या पाळण्यात बसू रे. मग ती व राजू एका पाळण्यात, पिंकी व संजूस मात्र माझ्याच पाळण्यात बसवून घेतलं. फिरता फिरता पाळण्याने वेग घेतला. पिंकी घाबरून मला बिलगली. राजू-संजू आनंदून गेले. एवढ्यात पाण्याचे शिंतोडे अंगावर येताहेत असा भास झाला. मी आजूबाजूस व वर पाहिलं. आभाळ तर स्वच्छ होतं. इतक्यात उलटी होतानाचा आवाज आला. पाहतो तर पाळण्याच्या वेगाने हिला उलटी होत होती, अन् त्याचा प्रसाद एकदा आम्हाला व एकदा हिच्या खालच्या पाळण्यातल्या खेडूत जोडप्यास मिळत होता. माझ्या अंगावर सरसरून काटा आला. प्रत्येकजण वर पाहत होतं. मी पाळणेवाल्याला हाताने खूण केली. त्यानेही तोंड वेंगाडत वेग कमी केला. हिला उतरवलं.  आम्हीही उतरलो. तोच ते खेडूत जोडपं जवळ आलं. ती बाई म्हणाली, "ए मावश्ये, वकाऱ्या व्हत्यात तर कशापाय पाळण्यात बसायचं?" तो खेडूतही म्हणाला, "आवं माज्या बी अंगावर शिंतोडे उडून वास सुटलाय निस्ता!" हे संभाषण किती लांबलं असतं कोण जाणे. चला सरका, पुढं व्हा, असं म्हणत त्या पाळणेवाल्यानं जणू माझी लाजच राखली.

समोरच्या हॉटेलात चहा-पाणी घेऊन पुन्हा नव्या दमाने आमचा ताफा पुढे सरकला. प्रत्येक लहान-मोठ्या दुकानात ही व मुले थांबत. तिथं खरेदी करण्यापेक्षा हिची चौकशी व घासाघीसच जास्त. रबरी बॉल, फुगे, पिना, कंगवे असल्या फालतू खरेदीस ही विनाकारण वेळ वाया घालवीत होती. मला मात्र त्या खरेदीत अजिबात रस नव्हता. एकतर पिंकीला घेऊन माझा हात भरून आला होता, शिवाय सामानाच्या पिशव्याही होत्याच. त्यात रविवार असल्याने गर्दीपण वाढत होती. सगळं आटोपून लवकर घर गाठावं म्हणून मी म्हणालो, 'उरका गं लवकर, झालं की नाही?'

'थांबा हो जराऽऽ' हिचं ठरलेलं उत्तर.

'हे बघ आता पुरे झालं, पटकन् सिद्धेश्वरांचं दर्शन घेऊ नि घरी जाऊ. चला बरं!'

सुमारे अर्धा-पाऊण तास रांगेत उभं राहून दर्शन घेऊन घराकडे निघालो. समोरच भेळपुरीचा गाडा होता. भेळ खायची ठरली. गाड्यावरही बरीच गर्दी होती. हातात प्लेट येईपर्यंत १०-१५ मिनिटे गेली असती. म्हटलं, तोवर घटकाभर टेकावं, कारण पिंकीच्या वजनाने मीही कंटाळलो होतो.

भेळ खाऊन झाल्यावर निघालो. जरा पुढे गेलो अन् एकदम लक्षात आलं की संजू आमच्या बरोबर नाहीए. हिला म्हणालो, 'अगं संजू कुठाय?'

'अहो, भेळ खाताना तर होता'

आम्ही सगळीकडे पाहू लागलो. त्या गर्दीत मुलाला शोधणं म्हणजे महाकठीण काम होतं. हिच्यावर जरा वैतागून म्हणालो. 'तुला मुलांकडे लक्ष ठेवता येत नाही का?'

त्याला शोधत सगळीकडे फिरू लागलो. काही केल्या पोर दिसेना. परत भेळीचा गाडा होता तिथपर्यंत गेलो. तिथंही नव्हता. निष्कारण जीवाला घोर लागला. हिचाही राग येत होता. जबाबदारी म्हणून कसलीच नाही. नुसती खरेदी अन् बडबड! म्हणून तर साऱ्यांना घेऊन कुठे जाणं नको होतं.

आणखी थोडा पुढे गेलो. रस्त्याच्या कडेने जत्रेतल्या दुकानदारांच्या झोपड्या होत्या. तसा फारसा उजेडही नव्हता. तरी पाहत निघालो. अन् एका झोपडीसमोर संजू मला दिसला. समोरचं ते दृश्य पाहून मात्र मी अवाक् झालो. झोपडीच्या समोर ४-५ वर्षांची दोन अर्धी उघडी मुलं व दीड-दोन वर्षांची लहान मुलगी दिसली. संजूची भेळची प्लेट त्या दोन मुलांच्या हातात होती व त्यातून थोडीशी भेळ हातात घेऊन संजू त्या लहान मुलीला देत होता.

एवढ्यात नेहमीच्या स्टाईलने ही त्याच्यावर खेकसली. 'संज्या गाढवा, काय करतोस इथं? आम्ही केव्हाचं शोधतोय? ह्याला फारच पुळका सगळ्यांचा!'

हिचं ओरडणं ऐकून मी म्हणालो, 'अगं, अशी ओरडतेस काय? त्या लेकराकडे बघ. तीन मुलांची आई होऊन तुला जे उमगलं नाही ते त्या लहान मुलाला उमगलंय.'

माझा जीव मात्र सुपाएवढा झाला होता. एवढ्या कोवळ्या वयात त्याला ही जाण कुठून आली असेल बरं? आपल्या बरोबरचं कुणीतरी भुकेलं आहे, त्याला आपल्या मुखीचा घास द्यावा वगैरे पांडित्य त्याला सांगता येत नसावं. पण त्यानं कृतीनं करून दाखविलं होतं एवढं खरं. मी पुढे गेलो. मायेनं त्याला उराशी कवटाळलं व आशीर्वादासाठी त्याच्या मस्तकावरून हात फिरवत राहिलो. खट्याळ, वात्रट अशा संज्यातून एका आगळ्यावेगळ्या गुणाचं दर्शन मला घडलं होतं. आम्ही घरची वाट धरली.

घरी आलो तरी त्या विषयाचं कुतूहल मला स्वस्थ बसू देईना. झोपताना मी संजूला विचारलं, 'अरे त्या मुलांना खाऊ देण्याची कल्पना तुला कशी सुचली?'

यावर अतिशय निरागसपणे त्याने सांगितले की, 'अहो बाबा, काल ना वर्गात आमच्या बाईंनी एक छानसा धडा शिकविताना सांगितलं की, दीन-दुबळ्यांना मदत करावी, भुकेलेल्यांना मायेने घास भरवावा. कारण रंजल्या-गांजल्यामध्येच देव वसत असतो. म्हणून मी तसं केलं. आता उद्या मी आमच्या बाईंना व मित्रांना ही गोष्ट सांगणार आहे.'

असं म्हणून शिणलेला संजू माझ्या कुशीत झोपी गेला खरं; पण मला मात्र वाटलं की आज मुलांच्या हट्टाने जत्रेला गेलो नसतो तर संजूतला हा सुप्त गुण मला कळलाच नसता, मग त्याच्या विकासाची धडपड तर लांबच...

पालक म्हणून आपणच कुठेतरी कमी पडतो की काय याचा वेध मन घेऊ लागलं. तसं पाहिलं तर मुलांना शाळेत पाठवून, रोज त्यांची सुरक्षित ने-आण करण्यातच आपण स्वतःला कर्तव्यदक्ष, आदर्श पालक समजून घेत असतो. निदान आव तरी तसाच असतो. स्वतःने स्वतःचीच फसवणूक केल्यागत.

नाही तर संजू मला खऱ्या अर्थाने यापूर्वीच कळला असता. शाळेत मिळत असलेल्या ज्ञान व माहिती बरोबर त्यास अभिप्रेत असणाऱ्या आचरणाशी व अनुभूतीशी सांगड घालण्याची जबाबदारी खरी तर आपलीच. ती जर जोपासली नाही तर मुलं नुसती पुस्तक-पंडित होतील. त्यानं त्यांचं वैयक्तिक जीवन देखील समृद्ध होणार नाही तर मग समाजहित, देशहिताच्या कल्पना तर दूरच...

साठलेलं पाणी गढूळ होऊन निरुपयोगीच होणार! तेव्हा त्याला मोकळं वाहू देणंच फायद्याचं. खडकांशी, झाडाझुडुपांशी टक्कर देत, सलगी करत वाहत राहून ते निर्मळ तर राहिलंच. पण दुसऱ्यांच्या उपयोगी पडण्याची कुवतही बाळगेल.

तेव्हा निश्चय केला की मुलांना अगदी तसंच 'जीवन स्नेही' बनवायचं, अवती-भवती फिरू द्यायचं, चौकटीबाहेर न्याहाळू द्यायचं, त्यांच्याशी संवाद साधायचा; कोणतीही सबब न सांगता!

अगदी सहजपणे घडलेली यावेळची जत्रा, जाणत्यांमध्ये विरळ होत असलेल्या व शिशुवर्गात दडपून जात असलेल्या माणुसकीची जाणीव करून गेली. विचारांना फुलवून व चेतवून गेली.

===========

---- सौ. माधुरी शहा, सोलापूर.

===========

Sunday, February 1, 1998

कस्तुरी

ऑफिसहून हे जरा खुशीतच आले. "अगं ऐकलंस का? आई बाबा येणार आहेत चार दिवसांनी."

"हो का!" मी त्यांना साथ देत म्हणाले. दोघेही यात्रेला जाता जाता एक दिवस आमच्याकडे राहून जाणार होते. ते येणार म्हणताच माझं स्त्री मन लगेचच स्वयंपाकघरात चक्कर मारून आलं. मी सहज म्हणाले, "ते आल्यानंतर श्रीखंड-पुरीचा बेत करू. चक्का आणा, बाकीचं मी घरी करेन. " पण हे म्हणाले, "छे, छे, विकतचं काही नको आणायला. आई-बाबांना पुरण पोळ्या आवडतात. त्याच कर."

"अहो, असं काय करता? पुरणा वरणाचा स्वयंपाक म्हणजे नसता पसारा! साधं सोईचं करू काही तरी." मी इतरही पदार्थ सुचविले. पण यांचं आपलं एकच पालुपद, पुरणाच्या पोळ्या! शेवटी माझा नाईलाज झाला.

लग्नानंतर आमचं गावी जाणं जरी वारंवार होत असलं तरी आई-बाबा मात्र प्रथमच आमच्याकडे येत होते. दोघांचीही भारी शिस्त होती हे मला ठाऊक होतं. मी घराची साफसफाई केली. पुरणाचा स्वयंपाक म्हणजे मला आत्तापासूनच टेन्शन आलं होतं. शेजारच्या काकूंना चार जणांचा अंदाज विचारला. त्यांनी सांगितलं, "अगं आदल्या दिवशी पुरण तयार कर नि फ्रीजमध्ये ठेवून दे. म्हणजे दुसऱ्या दिवशी तुझी घाई व्हायची नाही." हे ऐकून मला जरा हायसं वाटलं. पण नेमकं आमचं बोलणं यांनी ऐकलं व म्हणाले, 'तसलं शिळं आईला चालत नाही हे तुला माहीत आहे ना?" मी गप्प बसले. शेवटी आदल्या दिवशी सगळी सगळी तयारी करून ठेवली.

हे घरी आल्यावर  म्हणाले, "अगं कुमी पण येणार आहे हं आईबरोबर."

झाऽऽऽलं ऽऽ!  माझं टेन्शन आणखीनच वाढलं. दुसऱ्या दिवशी अकरा वाजेपर्यंत सगळे यायचे होते. यांनी त्या दिवशीची रजाच टाकली होती. त्यामुळे रात्री नुसते घोरत होते. मला मात्र बराच वेळ डोळा लागला नव्हता. एकटीनं कधीच पोळ्या केल्या नव्हत्या. शेवटी पहाटे चारलाच उठले, तसे चाहुलीने हे जागे झाले व म्हणाले, "अगं इतकी घाई काय?  झोप." "छे, हो उठायला हवं," असं म्हणत मी तडक स्वयंपाकघरात शिरले. पटकन् पुरण शिजायला टाकलं व नंतर सगळं उरकलं. पुरणयंत्रावर वाटून साखर टाकून ढवळायला लागले. पण काही केल्या आटून येईना. काय करावे सुचेना. यांची नजर चुकवून काकूंकडे पळाले. "काकू, अहो पुरण फार पातळ झालंय." "अगं, त्यात काय? जरा जास्त वेळा चटका दे, आटून येईल. पाणी नीट निघालं नसेल."

मग पुन्हा ते काम सुरू झालं.

दुसरीकडे भाताचा कुकर लावला. पण अजून थोडी वाफ येते न येते तोवर गॅस संपला. अरे देवा, आज जणू सारेच माझी परीक्षा पाहत होते. काकूंकडून स्टोव्ह आणला. प्रयत्न करून देखील पेटेना म्हणून यांना पाहायला सांगितलं, तर स्टोव्हच्या आधी हेच पेटले. काही प्लॅनिंग नाही. योजना नाही वगैरे व्याख्यान देत स्टोव्ह पेटवून दिला. खरं तर यात माझी काय चूक? पण हे असलं आपल्या भारतीय कुटुंबपद्धतीत चालतंच! मग जरा नरमाईनंच यांना गॅसच्या दुकानी फोन करायला सांगितला. मला मात्र माझ्या बालपणाची कविता आठवत होती-

'भात केला. कच्चा झाला. वरण (नव्हे पुरण) केलं. पातळं झालं.'

माझी इतर सगळी सगळी कामं झाली पण असून गॅसचा पत्ता नव्हता. मग यांनी स्वतः जाऊन गॅस सिलेंडर आणला, म्हटलं आता पोळ्यांना तवा टाकावा. तोवर पुन्हा यांची चहाची ऑर्डर आली. आयती बसून ऑर्डर सोडायची नुसती! इकडे माझी नुसती घालमेल चालली होती. शेवटी पोळ्यांना सुरुवात केली. पहिली पोळी लाटली, तव्यात टाकताना फाटली. दुसरी पोळी तव्यावर टाकली अन् बेल वाजली म्हणून बाहेर गेले तर येईपर्यंत करपून गेली. छे, छे जीव नकोसा झाला. यांचा इतका राग येत होता. कोणत्या जन्माचा सूड उगवत होते कोण जाणे. चांगला आयता चक्का आणा सुटसुटीत होईल म्हणत होते. पण यांना हव्या होत्या ना पुरणाच्या पोळ्याच!

धडपडून का होईना नंतरच्या बऱ्यापैकी जमल्या. एवढ्यात शेजारची रुपा आली. माझी चाललेली त्रेधा पाहून म्हणाली, "काय हे ऽऽऽ? अगं बाजारात हवं ते मिळतं अन् ते सोडून ही नसती उठाठेव कशासाठी? फारच बारकावा बुवा तुमचा!" रुपाचा हेवा वाटला मला. पण काय करणार?...

मंडळी आली. अंघोळी, चहा पाणी झाल्यावर आईंनी सारं घर पाहिलं. म्हणाल्या, "छान लावलंस हो घर! "

आत मी व वन्संनी पानं वाढायला घेतली. सगळे एकदमच बसलो. मनात जरा धाकधूकच होती. जेवण निम्मं झालं तसं आई म्हणाल्या, "झक्कास झालाय गं स्वयंपाक सूनबाई!"

मामंजीसुद्धा आवडीनं जेवत होते. आई म्हणाल्या, "बरं झालं बाई पुरण टाकलंस ते. नाहीतर हल्ली सगळं विकतचं! ती गुलाबजामची पाकिटं काय नि तो चक्का काय! घरी करायलाच नको. "

"अगं आई, बदलत्या काळाबरोबर बदलायला नको का?" वन्सं म्हणाल्या.

"हो नां, बदलायलाच हवं. वेळ, प्रसंग, गरजेनुसार त्याचा उपयोग करायला हवा एवढंच! पण हल्ली नको इतकं त्याचं स्तोम माजलंय ना, त्याचं वाईट वाटतं गं! हे बघ, घरी थोडेसे कष्ट पडतात खरंय, पण घरचं ताजं, शुद्ध व काटकसरीनं होतं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्या हातचं साऱ्या कुटुंबीयांच्या पोटात गेल्याचं वेगळंच समाधान लाभतं..." असं म्हणतच आईंनी गावाकडून येताना आणलेले माझ्या व यांच्या आवडीचे मोतीचूरचे लाडू व कडबोळी आग्रहाने वाढली.

उतारवयातील त्यांच्या आठवणीचे व कष्टाचे आश्चर्य तर वाटलेच; त्याचबरोबर गेल्या दोन-तीन दिवसांतील माझ्या विस्कटलेल्या विचारांची व संकुचित मनोवृत्तीची शरम वाटली...

हे मात्र माझ्याकडे पाहून मिष्किलपणे हसत होते. वन्सं म्हणाल्या, "वैनी, एकटीनंच केलंस ना सगळं, थकली असशील, थोडंसं बैस आता. बाकीचं मी पाहते." तेवढ्यात मामंजी जेवण संपवून 'अन्नदाता सुखी भव' असं म्हणत उठले. माझा सारा शीण कुठल्या कुठे पळून गेला. गप्पा मारताना मी मोकळ्या मनाने पुरण पोळीचा किस्सा साऱ्यांना सांगितला.

रात्री ९ वाजता सर्वजण निघाले, तसे हे म्हणाले, "अगं आई, हिच्या हातच्या पोळ्या खाल्ल्यास तेव्हा ओवा देऊ का?" सगळे खळखळून हसले.

आई-बाबांना नमस्कार करीत मी म्हणाले, "येताना पुन्हा या बरं का!" बाबा म्हणाले "अवश्य येऊ, पण एका अटीवर!" "कोणती?" मी म्हणाले, "तू पुन्हा पुराणाच्या पोळ्या करायच्यास." तसे सारे पुन्हा हसायला लागले.

मामंजी असं म्हणून गेले खरं, पण माझं मन निराळ्याच दिशेने धावू लागलं. खरं तर आज केवळ यांच्या हट्टाखातर, नाईलाज म्हणून की पोळ्या केल्या होत्या. पण ते एका परीनं बरंच झालं. दगदग, थोडा त्रास झाला खरा; पण अनुभव सुखद वाटला. जेवताना प्रत्येकाच्याच विशेषतः यांच्या चेहऱ्यावर वेगळंच समाधान दिसत होतं. बऱ्यापैकी का असेना, पण घरचं, स्वतः केलेलं होतं म्हणून तर ते समाधान नसावे ना?

आयुष्याच्या साथीदाराने माझ्या कष्टाची अशी निखळ पोहोच दिली तर मग सुखी संसाराची वेगळी व्याख्या करायची आवश्यकताच काय? वाटलं की आपण उगाचच साध्या साध्या गोष्टीतही वैयक्तिक सोईच्या व रुपासारख्या मैत्रिणी रुजवू पाहत असलेल्या आरामाच्या खुळ्या कल्पनेला बळी पडून घरातलं घरपण हरवून बसतो आणि त्यातून मिळणारा सहज आनंदही!

आपली अवस्था मृगासारखी झालीय खरी. 'कस्तुरी' नाभीतच पण आकलन न झाल्याने त्याच्या प्राप्तीसाठी सैरभैर धावणाऱ्या मृगासारखी!

छे, चुकतंच आपलं, तेव्हा ठरविलं हे सारं आता संपवायचं आणि घरातला सहज निर्मळ आनंद जोपासायचा, आपापसांतला विरळ होत चाललेला संवाद साधायचा, त्यासाठी धडपडायचं. आई-बाबांसारखं...

साध्याच प्रसंगातून झालेल्या वैचारिक मंथनानं आणि कस्तुरी शोधानं वेगळंच असं समाधान वाटू लागलं. त्या सुखद सुगंधित अनुभूतीत डोळा कसा लागला हे समजलंच नाही.

===========

---- सौ. माधुरी शहा, सोलापूर.

===========