Tuesday, October 13, 2009

पाहुणचार

दिवाळी आली की हटकून मला ३-४ वर्षापूर्वीच्या माझ्या पहिल्या दिवाळसणाची आठवण होते. लग्नानंतरची पहिली दिवाळी सासुरवाडीला झाली. सगळेच नवीन - संबंध, माणसे, स्वभाव! अन त्यात आमचा स्वभाव भिडस्त! म्हणून तर ती दिवाळी चांगलीच लक्षात राहिली.

दसरा संपवून ८-१० दिवस झाले की, सासरेबुवा येऊन वत्सलेला माहेरी घेऊन गेले. मलाही आग्रहाचे निमंत्रण होतच. पहिल्या आंघोळीच्या दिवशी सकाळी मी तिथे गेलो. सासुरवाडी अगदीच खेड्यात होती. एस. टी. स्टँडवर उतरून पुढे वस्तीवर जावे लागे. स्टँडवर दोन्ही मेहुणे, सासरे व इतर दोघे तिघे जण होते. मी बॅग घेऊन चालायला लागलो. तोवर गडी पळत येऊन म्हणाला, "चला दाजी. रस्त्याच्या कडला गाडी हुभी केलीया!" मला बैलगाडीची सवय नसल्याने मी म्हणालो, "बैलगाडी कशाला? चालतच जाऊ की वस्तीवर." पण एवढ्यात सासरेबुवा म्हणाले, "नगं नगं आवं तुमच्यासाठीच तर गाडी जुपलीय अन चालत कशापाय?" मग दोन्ही लहान मेहुणे व मी गाडीत बसलो, इतर सारे आमच्या मागे गप्पा मारीत निघाले.

बैलं पळायला लागली तसे माझ्या शरीराला जोरजोरात हिसके बसायला लागले. एकदा डोकं दांड्यावर आपटलं तर एकदा मीच जोरात उठून परत गाडीत आदळलो. म्हटलं आता घरी जाईपर्यंत आपलं काही खरं नाही. माझे दोन्ही मेहुणे मात्र गाडीच्या दांड्यावर बसून मजा लुटत होते. मला नेमकं कसं बसावं हेच समजेना अन बहुतेक माझी ही अडचण सासऱ्यांच्या लक्षात आली असावी. ते म्हणाले, "आरं हणम्या, गाडी जरा दमानं हाक की लेका, शेरातल्या मानसास्नी सवं नस्ती गाडीचीऽऽऽ". पण इकडं हणमंतराव गाणं म्हणत आपल्याच नादात गाडी हाकीत होते. त्यामुळे आमचे हाल चालूच होते.

खरं तर खेड्यातलं शुद्ध वातावरण, सकाळचा पक्ष्यांचा किलबिलाट, हिरवीगार वनराई या साऱ्यांनी एरव्ही मन कसं प्रसन्न झालं असतं. पण इथं या गाडीच्या हिसक्यांनी अंग नुसतं बुकलून निघत होतं. एवढ्यात गाडी वस्तीसमोर थांबली. मी टणकन उडी मारली नि सुटकेचा श्वास सोडला. सासूबाईंनी भाकरीचा तुकडा ओवाळून स्वागत केले. दाराच्या आडून वाकून वत्सला मोठ्या कुतूहलाने व हसत माझ्याकडे पाहत होती. पुन्हा तशाप्रकारचं कुतुहुलमिश्रीत हसणं, निरागस भाव कधीच दिसले नाहीत. कदाचित सर्वांचा हाच अनुभव असावा... असो.

हात-पाय धुऊन झाल्यावर चहा-फराळ आला. सासरे म्हणाले, "घ्या, फराळ घ्या दाजी"

फराळाला सुरुवात केली. चावून चावून कानशील दुखून आली तर तिखटानं नाकाला धार लागली. त्यात पून: पुनः आग्रह! कानशिलावरून हात फिरवीत मी नको नको म्हणत होतो. एवढ्यात हणम्या तेलाची बाटली घेऊन आला व म्हणाला, "चला दाजी, अंग चोळतो. " हणम्या आपल्या सर्व ताकदीनिशी अंग चोळायला लागला. त्याच्या हिसक्यांनी मी कळवळून म्हणालो, "अरं हणमंता, जरा सावकाश रेऽऽ"

"थांबा उईसं दाजीऽ, परवासानं शिणला असचाल नव्हं? अंग मोकळंच करतो." तो नेमका माझं अंग मोकळं करीत होता की त्याच्या स्वतःच्या ताकदीचा अनुभव घेत होता हेच मला समजेना.

"पुरे पुरे, हणमंता! " असं म्हणत उठून उभा राहिलो. "बरं बरं, आता उटणं लावून आंगुळच घालतू म्हंजी कामच संपील" असं म्हणत त्यांनी मुलांना हाक मारली, "या रंऽ पोरावानोऽ", अन आंघोळीला सुरुवात केली. घंगाळीतून मोठ्या तांब्यांनी पाणी अंगावर ओतलं नि मी थोडाफार ओरडतच उठून उभा राहिलो.

"अरे, अरे, पाणी फारच कडक आहे कीऽ". पण माझ्या बोलण्याकडे दुर्लक्ष करीत हणमंतानं मला दाबून खाली बसवत सपाटा लावला. मुलेही उटण्यानं अंग खसाखसा घासायला लागली. मग मात्र मला सोसवेना. मी तडक उठलो नि ओलेत्यानेच ओसरीवर येत अभ्यंगस्नानाची सांगता केली.

खरं तर दिवाळीचा सुमार म्हणजे थंडीची सुरुवात. पण असल्या थंडीत देखील दुपाऽऽऽरपर्यंत अंगाची व पाठीची आग आग होत होती. वैतागून मी वत्सलेला म्हणालो, "अगं काय हे घासणं? पाठ सकाळी सोलून निघाली असेल."

"तेल लावू का थोडंसं? मऊ पडेल. " ही हलक्या आवाजात म्हणाली. "छट, पाठीला हात लावायचं नाव काढू नकोस. आधीच सकाळी बैलगाडीत अंग तिंबून निघालंय यात आणखी ही भर!" वत्सलेला हे सारं पसंत नसावं. पण तशी ती अगदीच मऊ होती. कोणाला काही बोलली नाही. त्यांच्या सर्व कुटुंबात बारावीपर्यंत शिक्षण घेतलेली फक्त वत्सलाच. रोज तालुक्याच्या गावी जाऊन शिकली म्हणून तर सासऱ्यानं शहरातला जावई शोधला म्हणे.

दुपारच्या जेवणाला उशीरच झाला. गावातले चार-दोन लोक पंक्तीला होतेच. जेवण एकदम चमचमीत! अन आग्रह तर विचारता सोय नाही. दुपारी मस्तपैकी ताणून दिली.

दुपारचा चहा शेजारी अप्पांकडे झाला. अप्पांकडचा चहा फराळ म्हणजे सकाळच्या दात अन कानशील दुखीत दुपटीनं भर पडली. तिथून सासऱ्यांच्या शेतातून चक्कर मारली. बागायत शेती सगळी, फारच आल्हाददायक! पुढे लांबवर धुरांचे लोट, काही काही नव्हतं. सगळं कसं शुद्ध अन शांत शांत वाटत होतं. निसर्गातल्या आगळ्या वेगळ्या सानिध्यात मन कसं प्रसन्न झालं होतं. फिरून सारे वस्तीवर परतलो. सासूबाई पणत्या लावीत होत्या. दृश्य खरंच लोभसवाणं होतं. सगळ्या वस्तीवरच्या मुलांना घेऊन फटाके उडविले. मजा आली.

नको नको म्हणत पुन्हा रात्रीचे जेवण भरपूर झालंच. घरी अगदीच ठरावीक वेळी खायची सवय असल्याने रात्रभर अस्वस्थच होतो. पहाटे लवकर जाग आली म्हणून बाहेर आलो तर हणमंता अन मुलं आंघोळीच्या तयारीत असलेली दिसली. बाप रेऽ म्हणत पटकन पुन्हा खोलीत शिरलो व वत्सलेला ठामपणे सांगितले की आज परत कालाच्यासारखी आंघोळ घालाल तर मी तसाच गावी जाईन. मग हिच्या सांगण्यावरून आंघोळीचं संकट टळलं होतं, पण रात्रीपासूनची पोटदुखी चालूच होती. मी हिला सहजच म्हणालो, "अगं, रात्रीपासून पोट दुखतंय गं!"

झाऽऽलंऽ - बघता बघता ही बातमी साऱ्यांना समजली. लगेच अप्पा, आबा, मामा, पाटील सारेच गोळा झाले.

या साऱ्या लोकांच्या एकोप्याचं मला भारी कौतुक वाटलं अन लगेचच आमच्या चाळीतले दिवस आठवले. तिथही असच, जऽरा कुठं खुट्ट वाजलं की सारी चाळ गोळा व्हायची. मग सार्वजनिक विचार-विनिमय, सल्ला वगैरे वगैरे. पण हल्लीच्या फ्लॅटमध्ये पोट दुखू द्या नाहीतर कोणाचा जीव जाऊ द्या कुणाला त्याचं सोयर सुतक नसतं. साधं फिरकायला सुद्धा कोणाला सवड नसते. फ्लॅट सिस्टम मधली ही आधुनिक 'फ्लॅट' संस्कृती असावी कदाचित.

अप्पांच्या आवाजाने मी भानावर आलो. अप्पा पुढे सरसावत म्हणाले, "पोटदुखीवर लै जालीम औषध हाय माझ्यापाशी. हे बघा दाजीस्नी भरपूर जेवायला घालायचं अन पाण्यातून सोनामुखी घ्यायची. पोट नाही थांबलं तर इच्चारा मला. आवं काट्यांनी काटा काडायचा."

मग प्रत्येकजण आपापला औषधी बटवा मोकळा करू लागला. कुणी काय तर कुणी काय. आळीपाळीनं त्यातल्या दोन-तीन जिनसा माझ्या पोटात गेल्या अन आगीतून फोफाट्यात गेल्यासारखं झालं. दिवसभर हेलपाट्यानं बेजार झालो. माझ्यासोबत येणारा श्रीपतीसुद्धा हैराण झाला. शेवटी वत्सलेला विचारून परस्पर मी व श्रीपतीनी डॉक्टर गाठला व औषध घेऊन आलो. पण दुर्दैव माझं की घरी येईपर्यंत मंडळी वस्तीवर हजर होतीच. बहुदा आमची बातमी येण्यापूर्वीच पोचली असावी. कारण आम्हाला पाहताच अप्पा म्हणाले, "दाजी तिकडं कशाला गेला बरं? आवं डाकदर कसला, हजाम लेकाचा त्योऽ. आमी दिलं नसतं व्हय औषध? "  हे ऐकून मनात म्हटलं - कशाचं औषध अन काय? ऐन दिवाळीत पोटाचं दिवाळं निघालं. पण सावरीत म्हणालो, "तसं नव्हे अप्पा, जरा जास्तच त्रास व्हायला लागला म्हणून गेलो."

औषधाने बराच गुण आला. झोपही छान लागली. सकाळी उत्साह वाटत होता. रात्रीच्या गाडीनं परत गावी निघायचं होतं. सगळी तयारी करून ठेव असं वत्सलेला सांगितले. एवढ्यात पाटील आले व म्हणाले, "हं काय म्हनतीया जावईबापूंची तब्येत?"

"बरीय आता" मी म्हणालो.

"बगा बरं, आमच्या अप्पाचं औषध हायच तसलं."

मी गप्प बसलो. म्हटलं खुलासा करून परत नवीन संकट नको.

"आज आमच्यात जेवाया यायचं बरं का"

"नको, नको" मी घाईघाईनं म्हटलं, "अहो आत्ताच तर बरं वाटतंय त्यात आज गावाला पण जायचंय".

"मग त्येला काय होतंय? अवंऽ जान-जवान मर्द तुमी, अन असं भ्याया काय झालंय? काय व्हत नाही. वैनी, आज वच्छीला अन जावई बापूला पाठवा बरं जेवाया. त्यांच्यासाठी आज खास कोंबडं कापलया."

आता मात्र कहर झाला होता पाहुणचाराचा!

पण या साऱ्यांच्या आतिथ्याचं, पाहुणचाराचं मला भारी नवल वाटत होतं. प्रत्येकांच्या वागण्यात अगत्य, आग्रह, आपुलकी! कोणाला घरचा, शेजारचा वगैरे फरकच जाणवत नव्हता. सगळं कसं एकदिलानं चाललं होतं. त्यात थोडासा अतिरेकी पणा होता हे खरंय, पण ते सारं शुद्ध मायेपोटीच नव्हतं का? आपल्याकडे कुणीतरी यावं, पोटभर खावं! हीच भावना.

खरं तर ही भावना सुद्धा हल्ली कमी होत चालली आहे. भावनाच कमी होतेय तर मग स्वतः कष्ट करून जेवू-खाऊ घालणं तर लांबच. उलट एखाद्याकडे गेलो व दुर्दैवाने तिथे जर टी. व्ही. वर एखादी मालिका अथवा मॅच चालू असेल तर, भेटायला गेलेल्या माणसाचं सुद्धा "कशाला नसती ब्याद आली?" अशा चेहऱ्याने स्वागत होते. त्यामुळे असल्या पाहुणचाराचं माझ्यासारख्या शहरी माणसाला जरा जास्तच अप्रूप वाटलं आणि ही सारी जमेची बाजू गृहीत धरून मी पाटलांच्या जेवणाला शेवटी होकार दिला.

नेहमीसारखाच त्यांच्या आग्रहाला व कोंबडीच्या रस्स्याच्या मोहाला बळी पडून भरपेट जेवलो. पोट अगदी तडीस लागलं होतं. इथंही आमचा भिडस्त स्वभाव नडलाच.

निघायची वेळ झाली. सारी मंडळी एकत्र जमली. हुरड्याला, गुऱ्हाळाला यायचं आमंत्रण स्वीकारून साऱ्यांचा निरोप घेतला. एस. टी. मार्गाला लागली. वत्सला माझ्या खांद्यावर डोकं ठेवीन निर्धास्तपणे झोपली होती. गाडीच्या हिसक्यांनी पुन्हा माझ्या पोटात गडगडल्यासारखं वाटत होतं. त्यामुळं मी मात्र धास्तावून परमेश्वराचा धावा करत होतो, "देवा रे, घर गाठेपर्यंत आतून कोंबड्यानं बांग दिली नाही म्हणजे जिंकली रेऽ बाबाऽऽऽ"

===========

---- सौ. माधुरी शहा, सोलापूर.

===========