Saturday, September 19, 2009

सत्ता

निवडणुका व त्याच्या तारखा जाहीर झाल्या. वाटलं चला मतदानाच्या निमित्तानं सुट्टी मिळेल. तेवढाच आराम. पण हा माझा आनंद काही फार काळ टिकला नाही.

घरी गेलो तर तिथे निळूभाऊ व गजाभाऊ बसलेले दिसले. मला पाहताच ठेक्यात म्हणाले "याऽ याऽ आण्णासाहेब! तुमचीच वाट पाहत होतो."

मी म्हटलं, "का बुवा? आज या गरीबाची वाट?"

"अहो निवडणुका जाहीर झाल्यात. आम्ही उमेदवार शोधत होतो. निळूभाऊंनी तुमचं नाव सुचवलं. मग आलो इकडं." गजाभाऊ म्हणाले.

"छे हो, आम्ही मास्तर, आम्ही कसले होतोय उमेदवार!"

"आहो, हाय काय त्या नोकरीत? द्या की लाथाडून! उद्या निवडून आलात तर असले पाच-पंचवीस मास्तर येतील की तुमच्या हाताखाली!" - निळूभाऊ.

"नको नको! मला तुमची उमेदवारी पण नकोय अन् हाताखालची माणसंही." मी जरा तोडूनच बोललो. तरीही दोघे गळ घालायला लागले, पण शेवटी मी ठाम आहे हे पाहून निळूभाऊ म्हणाले, "अण्णांच्याऐवजी वैनीन्ला हुबं केलं तर?"

"हांऽ! अगदी बरोब्बर बोललात बघा निळूभाऊ!" गजाभाऊ बोलले. "म्हंजे कसं?, त्या विमलीला शह दिल्यासारखं हुईल, लई तोरा हाय तिजा!"

मग दोघेही हिच्या पाठीमागे लागले. एवढा वेळ गप्प असलेली आमची ही म्हणाली, "भावजी, मला काय कळतं त्या राजकारणातलं? मला नकोय ते झंझट!"

"अहो वैनी, तुमी नुस्तं व्हय म्हना. बाकीचं सगऽळं आम्ही बगून घिऊ. प्रचार, निधी, कचेरीत जायचं, चिन्नं आनायचं, काय म्हनून काय तुम्माला बगावं लागाचं न्हाय, फकस्त तुम्ही व्हय म्हना."

"अरे काय व्हय म्हणा? कुणी मत तरी द्यायला नको का? विनाकारण डिपॉझिट जप्त व्हायचं" मी म्हणालो.

तसं लगेचच निळूभाऊ बोलले, "अहो हितं कुनाला जग जिंकायचंय? आपल्याला निस्ती त्या विमलीची मतं फोडायचीत."

"मग तुम्हीच उभे राहा ना", मी कंटाळून म्हणालो.

"गेल्या बारीनं हुबाच व्हतो, पन आपटलो ना! म्हून तर या बारीनं दुसरा उमीदवार हुडकतुया. वैनी, एकदाच हुबं ऱ्हावा, पुन्ना कंदी आग्रं धरावचो नाय..."

होय, नाही करीत शेवटी एकदाचा कचेरीत जाऊन हिचा अर्ज भरला गेला. हां हां म्हणता सगळीकडे बातमी पसरली. शाळेमध्ये तर माझा भाव एकदमच वधारला. जो तो "हं, काय पाटील, बायकोला पुढं करून तुम्ही राजकारणात शिरलात म्हणे? आता काय बुवा आम्हाला विसरणार?" असे म्हणू लागला.

"अहो, कसलं विसरणं आलंय? हिच्या उभं राहण्यानं टेन्शन मात्र आलंय" असे माझे त्याला उत्तर असे.

निळूभाऊ व गजाभाऊ ही जोडी तशी बिलंदर! संधीसाधू! आणी हिला तसा काही आचपेच कळत नव्हता. त्यामुळे मला जागरूक राहणं भाग होतं. अर्ज भरल्यापासून दोघांच्याही आमच्या घरच्या चकरा वाढल्या होत्या. वेगवेगळी मंडळं दाखल होत होती. अर्ज भरल्यानंतर आठवड्याभरातच दोघे आले. दोघांत नेहमी निळूभाऊंचा पुढाकार असे. म्हणाले, "वैनी, आता लौकरच प्रचाराचा नारळ फोडला पाहिजे बरं का? म्हंजे झ्याईरातीसाठी निधी गोळा करता ईल. आदी देवीला नारळ फोडू अन् सगळे मिळून निदी गोळा कराया जाऊ."

खरं तर हिच्या पक्षाच्या प्रचारापेक्षा दोघांनाही निधीतच जास्त इंटरेस्ट होता हे मी जाणत होतो. पण आता ते म्हणतील त्याला हो म्हणणं भाग होतं. त्यात निळूभाऊ स्वतः याआधीची निवडणूक लढल्यामुळे (की पडल्यामुळे?) राजनीतीचे डावपेच त्यांना चांगलेच माहीत होते.

विमलताई (निळूभाऊंची इमली) गेल्या निवडणुकीत निळूभाऊंवर मात करून प्रचंड मताने निवडून आल्या होत्या. म्हणून तर यावेळी त्यांना विमलीवर विजय मिळवायचा होता. एकेदिवशी सकाळीच निळूभाऊ आले अन् म्हणाले, "वैनी, जरा कुक्कू आना बरं आतनं, चिन्न आनलंय्". हिनं हौसेनं करंडा आणला. निळूभाऊंनी घडीचा कागद हलकेच उघडला, तो पाहून ही ओरडली, "हे काय? वस्तरा?"

"अहो, त्या विमलीचं चिन्न तेलाची बाटली हाय, म्हून मुद्दाम हे चिन्न निवडलंय. आता ह्या वस्तऱ्यांनीच इरुद्ध पार्टीची हजामत करू. मग लावा म्हनावं टाळूला तेल कसं लावत्यात ते."

त्या विमलताईंच्या ईर्ष्येने का होईना निळूभाऊ हिच्याकडे जास्त लक्ष देत होते एवढं खरं.

"हं वैनी, करा सुरुवात", "चांदीच्या तबकात केशरी बुक्का, अन् वस्तऱ्यावर मारा फुलीचा शिक्का."

प्रचाराला वेग आला. हिनं हिच्या मंडळातल्या, शेजारच्या अशा १०-१५ महिलांचा गट तयार केला. शिवाय ती जोडगोळी हिच्याबरोबर होतीच. निळूभाऊंचे उपद्व्याप चालूच होते. त्यांनी कुठल्या तरी सिनेमाचा वयस्क हिरो आणून, हिच्यासमवेत त्यांचा फोटो काढून पेपरला दिला व बातमी दिली की, सुप्रसिद्ध सिनेनट सौ. कमलताई पाटलांच्या पक्षात सामील! त्यांच्याबरोबर एक सभा पण घेतली. हिला म्हणाले, "वैनी, आजच्या सभेत दुसऱ्या पक्षाला शिव्या हासडायच्या बरं का?"

"म्हणजे?" ही म्हणाली.

"अहो भाषण तेच. निस्तं पक्षाचं नाव बदललं म्हंजे झालं!"

त्या एका महिन्याच्या अवधीत हिला कित्ती अनुभव आले असतील? बरंच झालं. जरा बाहेरच्या दुनियेची तोंडओळख तरी झाली त्या निमित्तानं!

एका रविवारी शेजारच्या खेड्यात हिनं प्रचारसभेचं आयोजन केलं. मला म्हणाली, "आज तुम्ही यायचं हं." सभा दुपारी चारला होती. आम्ही वेळेतच गेलो. पण सगळा शुकशुकाट होता. "हे काय? सभा असल्याचं जाहीर केलंय ना?" मी म्हणालो.

"हे तर नेहमीचंच आहे. थोडं थांबा. भावजी सगळं व्यवस्थित करतील."

निळूभाऊ, गजाभाऊ गावात गेले अन् बघता बघता ५-२५ माणसं लगेचच गोळा झाली. हळूहळू गर्दी वाढू लागली. निळूभाऊंनी थोडी प्रस्तावना केली व हिला म्हणाले, "वैनी, चला सुरू करा!"

हिनं भाषणाला सुरुवात केली. "मतदार बंधू-भगिनींनो, मागच्या नेत्यानं या पाच वर्षात काय दिवे लावले आहेत हे तुम्ही जाणताच. तेव्हा आता जास्त काही भाषणबाजी न करता मी आश्वासन देते की, गावच्या विकासासाठी गावात पाणी, शेतीपंपासाठी वीज व वाहतुकीसाठी पक्क्या सडका करून देऊ. मी अभिवचन देते की ज्याप्रमाणे आपल्या देशाच्या संरक्षणासाठी परवा कारगिलमध्ये आपले शूर जवान ज्या शर्थीनं लढले त्याच शर्थीनं आम्ही ही निवडणूक लढवून तुमचा विकास करू. त्यासाठी प्राण गेला तरी बेहत्तर!"

अरे, रे रे, हिच्या या अफाट वक्तृत्वाने मी मात्र खजील होऊन मान खाली घालून बसलो. कशाचा संबंध कशाला लावीत होती! कारगिल, अभिवचन, प्राणाची बाजी, असले शब्द वापरल्याने आपलं भाषण भारदस्त वाटेल असं ही समजत होती की काय? तेवढ्यात लाईट गेली. मी सुटकेचा श्वास सोडला. नाहीतर आणखी कितीवेळ असली असंबंध भाषणबाजी ऐकावी लागली असती कोणास ठाऊक!

माईक बंद पडल्यामुळे हिचे फक्त हातवारे व तोंडाची हालचाल दिसायला लागली. लोकांची चाललेली चुळबूळ पाहून मी हिला खुणावलं, आटपतं घे. पण लगेच निळूभाऊ म्हणाले, "वैनी लाईट आत्ता ईल, तुमी बोलत ऱ्हावा."

लाईट आलीच नाही, पण एकंदरीत वातावरणाचा अंदाज घेऊन, पुढला अनर्थ टाळण्यासाठी आम्ही घर गाठलं.

घरी आल्यावर मी हिला चिडून म्हणालो, "बंद करा आता हा प्रचार! उगाच काही देणं न घेणं. निष्कारण डोक्याला ताप!"

ही म्हणाली, "झालं, दोन-तीन दिवसात प्रचार बंदच होईल. मग निवांतच आहे."

प्रचार बंद झाला. सगळं कसं शांत शांत वाटायला लागलं. आवाजांनी डोकं नुसतं भणाणून गेलं होतं. मतदानाच्या आदल्या दिवशी ही जोडगोळी आली व "वैनी चला बरं जरासं आमच्याबरोबर" असं म्हणून हिला बरोबर नेलं. जाताना माझ्याकडून थोडेसे पैसे सुद्धा नेले. हिचा प्रचार सुरू झाल्यापासून माझ्याच खिशाला कितीतरी झळ बसली होती.

नेमकं कोणाला काय हवं असतं ते निळूभाऊंना माहीत असल्यामुळे ज्याला-त्याला जे-ते देऊन मंडळी उशीराने घरी परतली. मतदान शांततेत पार पडलं. मी सुटकेचा श्वास सोडला.

मतमोजणी सुरू झाली. मी हिला म्हणालो, "अगं, निळूभाऊ, गजाभाऊ कसे आले नाहीत?"

"अहो, मी पण त्यांचीच वाट पाहतेय." ही अस्वस्थ होत म्हणाली.

त्यादिवशी दुपारपर्यंत निकाल जाहीर झाले. फटाक्यांची आतषबाजी झाली अन् आवाज आला, "कमलताई पाटलांचा विजय असो."

"अऽरे" मी आश्चर्याने अवाकच् झालो.

काही का असेना, पण हिच्या विजयाचं श्रेय निळूभाऊ व गजाभाऊंनाच जात होतं. गुलाल, हार-तुऱ्यात हिची मिरवणूक काढण्यात आली. दोघेही थाटात अंगरक्षकाप्रमाणे हिच्या शेजारी उभे होते.

रात्री मी हिला म्हणालो, "अगं आता दोघेही तुझे पी. ए. होतील हं; आता तर फार सांभाळून राहावं लागेल, नाहीतर हे दोघे काय करतील याचा भरवसा नाही."

तशी ही जराश्या थाटातच म्हणाली, "अहो कांऽही काळजी करू नका. इतके दिवस वस्तरा त्यांच्या हातात होता, पण आता तो माझ्या हातात आलाय. विनाकारण मध्ये-मध्ये डोकं खुपसायला लागले तर त्या वस्तऱ्यांनीच दोघाची पण ... करेन."

"व्वा, शेरास सव्वा शेर!" मी म्हणालो.

पण लगेच तिरक्या नजरेने माझ्याकडे पाहत म्हणाली, "तेच काय, कुणीही मध्ये नाक खुपसलं तर त्यांची हीच गत होईल."

अरे बापरेऽ! आजच सत्ता हातात आलीय तर हा रुबाब? सत्तेत एवढं सामर्थ्य!

ही निवडणूक माझ्या सुद्धा अंगलट येणार की काऽय?

===========

---- सौ. माधुरी शहा, सोलापूर.

===========